नागपूर: छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण आंदोलकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारणे योग्य नव्हते, असे मत अजितदादा गटाचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी व्यक्त केले. खातेवाटपासंदर्भात महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मंत्रिमंडळ निश्चित झाल्यानंतर वातावरण निवळण्यासाठी चर्चा केल्या जात आहेत. ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही, त्यांच्याबाबत तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करत असावेत, असे अनिल पाटील यांनी म्हटले. ते मंगळवारी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी अनिल पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे नेते आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या (Anil Patil) बॅनर्सला जोडे मारणे योग्य नव्हते. आतापर्यंत आपल्याला जे काही मिळाले आहे, ते पक्षामुळे मिळाले आहे, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे होती. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढला आहोत. त्यामुळे जोडे मारो सारखी आंदोलनं करणे योग्य नाही, हे माझे कार्यकर्ता म्हणून मत आहे, असे अनिल पाटील यांनी म्हटले.  


मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले नाही. मला गेल्यावेळी अपेक्षा नसताना मंत्रि‍पदाची संधी मिळाली. त्यामुळे आता मला डच्चू मिळाला, असे बोलणे योग्य ठरणार नाही. मला वगळलं असं बोलण्यापेक्षा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्यासाठी मला काही काळ थांबवलं असेल, असे बोलू शकतो. अजित पवार हे दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीला गेले आहेत का, असा प्रश्नही अनिल पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर अनिल पाटील यांनी म्हटले की, अजितदादा कुठे आहेत, हे संध्याकाळी कळेल. यावेळी त्यांना खातेवाटपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना, खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यावर मी बोलणे योग्य नाही, असे अनिल पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळांच्या या नाराजीनाट्यात पुढे काय-काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



आणखी वाचा

मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....


छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....