Uddhav Thackeray Interview : एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Interview : "एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत," असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. '
Uddhav Thackeray Interview : "एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत," असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता प्रसारित झाला असून दुसरा भाग हा उद्या 27 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता प्रसारित होईल.
18 जुलै रोजी बंगळुरुत विरोधी पक्षांची बैठक झाली. विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. त्याच दिवशी भाजपने एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला 36 पक्ष उपस्थित होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत."
'शिवसेना' हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल
या मुलाखतीत शिवसेना हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, 'शिवसेना' हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.
... मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात
पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीका केली. "काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करु शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे, त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली. लोक म्हणताहेत की, जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करु नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाहीय, असंही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं.
VIDEO : Uddhav Thackeray Interview : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर पहिलीच मुलाखत,शिंदे-फडणवीसांसह मोदींवर टीका
संबंधित बातमी