मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत टिकून असलेल्या आमदार आणि नेत्यांना तपास यंत्रणांच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. यामध्ये आता उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांची भर पडली आहे. अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशीसाठी समन्स पाठवल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे अनिल देसाई यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने मूळ शिवसेना पक्षाच्या बँक खात्यासंदर्भात चौकशी सुरु केली होती. याच प्रकरणात आता अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. 


अनिल देसाई यांच्यावर नेमका काय आरोप?


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष कोणाचा, यावरुन कायदेशीर वाद निर्माण झाला होता. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी अनिल देसाई यांनी तत्परतेने शिवसेना पक्षाच्या बँक खात्यामधील 50 कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली होती. ही बाब नंतर शिंदे गटाच्या लक्षात आली. याविरोधात त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे आता अनिल देसाई यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. येत्या काही दिवसांमध्ये त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. यावेळी अनिल देसाई 50 कोटी रुपयांच्या रक्कमेबाबत काय स्पष्टीकरण देतात, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 


ठाकरे गटाच्या कोणत्या नेत्यावर तपास यंत्रणांची वक्रदृष्टी?


एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखून असलेल्या जवळपास सर्वच नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक या नेत्यांचा समावेश आहे. यापैकी संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईमुळे काही महिने तुरुंगात घालवावे लागले होते. तर अनिल परब, रवींद्र वायकर, राजन साळवी यांच्या घरावरही तपास यंत्रणांचे छापे पडले होते. 


आणखी वाचा


दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे गटाचा दावा, अनिल देसाई लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता 


मी मोदींचा माणूस असं शिंदे म्हणाले, मग शिवसेना कुणाची याचा निकाल स्पष्ट : अनिल देसाई