मुंबई : इंडिया (I.N.D.I.A) आघाडीमध्ये सध्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच ठाकरे गटाकडून (Thackeray Group) या जागेसाठी दावा सांगण्यात येत असून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
अनिल देसाई यांची राज्यसभेची टर्म 2024 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अनिल देसाई यांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय. त्याचमुळे काही दिवसांपासून अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईमधील शाखांना भेटी देणे त्यासोबत बैठका घ्यायला सुरुवात झालीये. त्यामुळे ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यास शिवसेना खासदार राहुल शेवाळे विरोधात अनिल देसाई निवडणुकांसाठी उभे राहू शकतात. याच जागेवर काँग्रेसकडून देखील दावा सांगण्यात येतोय. त्यामुळे यावर इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.