मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध असलेल्या आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खास मर्जीतील आणि विश्वासातील नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी नाईलाजाने शिंदे गटात प्रवेश केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावरील पक्षप्रवेश सोहळ्यात रवींद्र वायकर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी रवींद्र वायकर यांनीही कोणताही आडपडदा न ठेवता शिंदे गटात प्रवेश करण्यामागील खरे कारण स्पष्टपणे सांगून टाकले. रवींद्र वायकर यांच्या या एकूण बोलण्याचा सूर लक्षात घेता त्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू पटण्यापेक्षा किंवा त्यांचे मनपरिवर्तन झाल्यामुळे नव्हे तर निधीअभावी स्वत:च्या मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.
रवींद्र वायकर यांनी विरोधी पक्षात असताना शिंदे-फडणवीस सरकारकडून निधीवाटपात होत असलेल्या भेदभावाविषयी न्यायालयात धाव घेतली होती. याच मुद्द्यावरुन रवींद्र वायकर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा रवींद्र वायकर यांनी आपण राज्य सरकार निधीवाटपात दुजाभाव करत असल्याविषयी कोर्टात तक्रार केल्याचे स्पष्टपणे सांगितले. न्यायालयाने माझी मागणी फेटाळून लावली. त्यानंतर मी सभागृहातही संसदीय आयुधे वापरुन हा प्रश्न मांडला. सगळ्या आमदारांनाच निधी हा मिळालाच पाहिजे. सत्तेत असलेल्यांना जास्त निधी मिळतो, असेही त्यांनी म्हटले. यावर एकनाथ शिंदे यांनी वायकर जास्त निधी मिळवण्यासाठीच सत्तेत आलेत, अशी मिश्कील टिप्पणीही केली.
रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाचं खरं कारण काय?
रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यामागील आपली भूमिका यावेळी मांडली. माझ्या मतदारसंघात मोडकळीस आलेल्या इमारती, पाणी आणि आरे भागातील रस्त्याची समस्या आहे. यासाठी निधीची आवश्यकता आहे. काही धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीच मतदारसंघातील लोक आपल्याला निवडून देतात. आज देशात मोदी साहेबांची सत्ता आहे. देशाचा कारभार ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यसाठी शिंदे गटात आलो आहे. ते प्रश्न सोडवले जातील, याची मला खात्री आहे. हे प्रश्न सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले. यावेळी रवींद्र वायकर यांनी पक्षप्रवेश आटोपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातात लगेच आपल्या मागण्यांच्या कागदपत्रांचा गठ्ठा ठेवला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण वायकर यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
आणखी वाचा