बीड : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून बीड लोकसभा (Beed) मतदारसंघात स्वत: उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेत पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. देशातील विकासकामे पाहता बीड जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यायला हवी, असे दोन्ही नेत्यांनी म्हटले. येथील लोकसभा मतदारसंघा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं जात आहे, त्यातूनच पकंजा मुंडेंविरुद्ध (Pankaja Munde) जातीय प्रचार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजेंना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. यावेळी, हॅलिकॉप्टरमधून एंट्री घेत उदयनराजेंनी व्यासपीठावर हवाच केल्याचं दिसून आलं. 


बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दुसरीकडे राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सांगता सभांचा धडाकाही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयनराजे भोसले ह्यांनी परळीत जाहीर सभा घेतली. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे, व्यासपीठावरुनच माझ्या बहिणीला निवडून द्या, असे आवाहन उदयनराजेंनी बीडच्या जनतेला केलं आहे. 


उदयनराजेंनी हेलिकॉप्टरनमधून परळीत एंट्री केली, त्यावेळी, त्यांना पाहण्यासाठी हेलिपॅड उतरणार असलेल्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर, भाषणाला उभे राहिलेल्या उदयनराजेंनी हात जोडून, खाली वाकून पंकजा मुंडेंना, माझ्या बहिणीला निवडून द्या, असे आवाहन बीडकरांना केले. यावेळी, ते काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. मात्र, उदयनराजेंनी हात जोडल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्याकडे कॉलरस्टाईलची मागणी केली. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी बीडमध्येही कॉलर उडवली, यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या अन् शिट्ट्या वाजवत एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून उदयनराजेंनी पुन्हा फ्लाईंग किस देऊन सर्वांचीच मने जिंकली. उदयनराजेंनी आपल्या भाषणात बीडकरांना भावनिक सादही घातली. तुम्ही माझ्या बहिणीला निवडून द्या, नाहीतर मी राजीनामा देतो, आणि माझ्या जागेवरुन पंकजाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हटले.   



शरद पवारांचीही सांगता सभा


बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. मराठा समाजाचा उमेदवार मैदानात उतरल्याने आधीच मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असलेल्या बीडमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीला जातीय वळण लागल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी अंबाजोगाईमध्ये सभा घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची प्रचाराची सांगता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरात होत आहे.तत्पूर्वी अजित पवार आणि उदयनराजेंनी परळीत सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलंय.


हेही वाचा


पहिल्या तीन टप्प्यात मोदींच्या सभांचा रेकॉर्ड, किती सभा घेतल्या; राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर