Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या (Ahmednagar Lok Sabha Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या लोकसभेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील 45 दिवसांचा प्रचार झाला. काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मविआ उमेदवार निलेश लंके यांच्यावर पारनेर येथील सभेत जोरदार टीका केली. 


महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) नगरचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला. यावर आता निलेश लंके यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.  


अजित पवारांशी निवडणूक झाल्यानंतर बोलू


निलेश लंके म्हणाले की, दादांना मी फोन करून विचारणार आहे. दोन दिवस निवडणुका होऊ द्या, मग पाहू. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती त्यामुळे ते बोलले असतील. आपण एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असतो तेव्हा त्याच्याबाबतीत सकारात्मक बोलणे अपेक्षित असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  


धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत 


45 दिवसात बहुतांश गावात जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अनेक निवडणुका पहिल्या. आपण उमेदवार म्हणून जनतेत जातो. तेव्हा जनतेची अपेक्षा असते की, उमेदवाराने आपल्यापर्यंत यावे. या निवडणुकीत मला जाणवले की, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत केले. एकंदरीत असे दिसून येते की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत पाहायला मिळेल. 


विखेंना अपयश दिसतंय


तुम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार केला आहे. तर सुजय विखे पाटील यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणे आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केलाय. याबाबत विचारले असता निलेश लंके म्हणाले की, त्यांनी मोदींच्या नावावर मत मागण्यापेक्षा स्वतःच्या कामावर मत मागणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही म्हणजे त्यांना त्यांचे अपयश दिसून आले आहे.  ज्या वेळेस माणूस दुसर्‍याचा आधार घेतो त्यावेळेस आपल्याकडे काही राहिलेले नसते, असा टोला त्यांनी यावेळी सुजय विखे पाटलांना लगावला आहे. 


विखेंच्या पायाखालची वाळू सरकलीय 


तुमच्यावर गुंडशाही, दडपशाहीचे आरोप झाले. या निवडणुकीत प्रचार खालच्या थराला गेला का? अशी विचारणा केली असता निलेश लंके म्हणाले की, कुठल्याही उमेदवाराने व्यक्तिगत बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणे अपेक्षित असते. मात्र ज्या वेळेस आपल्याकडे काही राहिलेच नसते त्यावेळी माणूस व्यक्तिगत टीका करतो. ज्या वेळा माणूस खालच्या थराला जातो, त्यावेळेस त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली असते, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


Ajit Pawar : मी अनेकांचा बंदोबस्त केलाय, माझ्या नादी लागू नकोस, तुझा असा कंड जिरवेन की...; अजित पवारांचा निलेश लंकेंना थेट इशारा