सातारा: राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवनवीन आघाड्या, युती किंवा एकमेकांच्या कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांचे मनोमीलन होताना दिसत आहे. साताऱ्यात शनिवारी असाच एक प्रसंग अनुभवायला मिळाला. साताऱ्याच्या राजकारणात छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले (Udyanrje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद हा नवीन नाही. परंतु, शनिवारी शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सातारकरांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर अक्षरश: प्रेमाचा वर्षाव केला. उदयनराजे भोसले हे भाजपकडून सातारा लोकसभा (Satara Loksabha) लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. परंतु, उदयनराजे यांनी ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती, असे स्पष्ट केले.


उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या मोकळ्याढाकळ्या शैलीत शिवेंद्रराजे यांच्याविषयी आपल्या मनात कोणतीही कटुतना नसल्याचे सांगितले. शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देताना उदयनराजेंनी म्हटले की, शिवेंद्रराजे यांनी फार मोठं व्हावं. लाँग लाईफ, लॉटस् ऑफ लव्ह, लॉटस ऑफ सक्सेस. त्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. मला माहिती आहे, कोण काय प्रश्न विचारणार. पण धिस इज नॉट पॉलिटिकल. मी आजपर्यंत जे करत आलोय, ते यापुढेही करणारच. आज जे चाललंय ती काळाची गरज आहे. आमचे लहानपणीचे फोटो बघितले तर शिवेंद्रराजे यांच्यापायी मी काकींचा मार खाल्लाय. तरीही माझ्याकडून अनावधानाने काही चुकलं असेल तर मी माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो. शिवेंद्रराजे यांनी आता सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचा कारभार बघावा. आयुष्यात कधीतरी प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे. आज ही बिकम 50. शिवेंद्रराजे आणि माझे आता हसतानाचे फोटो काढा, मी जिल्ह्यात बॅनर्स लावतो, असे उदयनराजे यांनी म्हटले. मी शिवेंद्रराजे यांच्याविषयी जे बोलतोय, ती भावना आतापुरती नाही. धिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे, टिल आय डाय, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले.


मी छोटा आहे, सातारा-जावळीच्या पलीकडे जात नाही: शिवेंद्रराजे भोसले


उदयनराजे भोसले हे शिवेंद्रराजे यांना शुभेच्छा देताना चांगलेच भावनिक झाले होते. शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याउलट शिवेंद्रराजे यांनी संयतपणे सातारा लोकसभेबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, महाराज इकडे आले त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की, राजकीय विषय वेगळे, घरातील विषय वेगळे. ते साताऱ्याच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी 10 हत्तींचं बळ देणारा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहोत, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. सातारा लोकसभेचा उमेदवार वरुन लवकरात लवकर जाहीर करावा. म्हणजे आम्ही कामाला लागू. उदयनराजे भोसले यांचं वर काय चाललंय माहिती नाही, मी छोटा आहे. मी सातारा-जावळीपलीकडे जात नाही, असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले.


आणखी वाचा


अखेर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये साताऱ्याचा तह, उदयनराजे भोसले लोकसभेच्या रिंगणात, तिढा कसा सुटला?