मुंबई : महायुतीमध्ये ज्या जागेवरुन तिढा कायम होता ती त्या साताऱ्याच्या (Satara Lok Sabha Seat) जागेचा तिढा सुटला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला (BJP) देण्यास मान्यता दिली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात साताऱ्याचा तह झाला आहे. या तहानुसार साताऱ्याची जागा भाजपला देण्यात येईल. या जागी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) लोकसभा निवडणूक लढवतील. उदयनराजे भोसले यांचा राज्यसभेचा उर्वरित कार्यकाळ असेल त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राज्यसभेवर जाईल या अटीवर  ही जागा सोडण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोट्यातील जागा अखेर भाजपला देण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीनं भाजपला जागा सोडली आहे  त्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या राहिलेल्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार आहे. उदयनराजे भोसले यांचा 2026 पर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे. उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादीचा सदस्याला राज्यसभेचा 2 वर्षांचा कार्यकाळ मिळणार असल्याची माहिती आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जतला मेळावा पार पडला होता. कर्जतच्या मेळाव्यात अजित पवार यांनी सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून साताऱ्यातून नितीन पाटील यांचं नाव चर्चेत होतं. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी देऊ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरुन लढण्यास नकार दिला होता. अखेर उदयनराजे भोसले यांचा भाजपकडून लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा भाजपला सोडली आहे. आता या जागेऐवजी उदयनराजे भोसले यांची रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाऊ शकते.   


साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण असणार हे स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून साताऱ्याच्या जागेसाठी श्रीनिवास पाटील, सुनील माने, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. थोड्याच वेळात याबाबत अंतिम उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. 


संबंधित बातम्या :


VBA : वंचितनं अखेर पत्ते उघड केले, महाविकास आघाडीशी फारकत, नागपूरमध्ये वेगळा निर्णय, गडकरींचं टेन्शन वाढणार


सांगलीचा तिढा कायम! काँग्रेस नेत्यांची आज 'दिल्लीवारी', विश्वजीत कदमांसह विशाल पाटील सोनिया गांधींना भेटणार