Jignesh Mevani Arrested: आसाम पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. आसामच्या बारपेटा पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना त्यांच्या ट्विटशी संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात पुन्हा अटक केली आहे. जिग्नेश मेवाणीचे वकील अंगशुमन बोरा यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. पुन्हा अटक केल्यानंतर मेवाणी यांना कोक्राझार जिल्ह्यातून बारपेटा येथे नेण्यात येत आहे.


पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात केलं होत ट्वीट


गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केलं होत. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने त्यांना या प्रकरणी सोमवारी जामीन मंजूर केला होता. कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. सुनावणीनंतर मेवाणीला कोक्राझार तुरुंगात परत नेण्यात आले आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले की, जामीन अटींशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली जात आहे. मात्र आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 


यापूर्वी जिग्नेश मेवाणीला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती


जिग्नेश मेवाणी यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती. कोक्राझार पोलिस ठाण्यात त्यांच्या एका ट्विटवर एफआयआर नोंदवण्यात आला होता. ज्यात त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "गोडसे यांना देव मानतात''. यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर कोक्राझार येथे आणण्यात आले होते. कोक्राझारच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेवाणी यांना  21 एप्रिल रोजी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :