Raju Shetti on Maharashtra Politics: नांदेड : राज्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra News) झाल्या आहेत, हे सर्व प्रश्न पाहून सत्ताधारी एकमेकांची ऊनीदुनी काढण्यात मग्न आहेत. बघून घेतोची भाषा हे सगळं टोळी उद्योग सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे. तिसऱ्या आघाडीचा जसा प्रयोग दिल्लीत झाला, जनतेतून उमेदवार तयार करणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. आताचे राजकारणी धंदेवाले झाले आहेत, यांची दुकानदारी बंद करण्यासाठी हा प्रयोग आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून पोलिसांना टार्गेट दिलं जातंय : राजू शेट्टी
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन राजू शेट्टी यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी बोलताना म्हणाले की, "सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, त्यामुळे पोलिसांना टार्गेट देण्यात आलं आहे. लाडक्या बहीणला पैसे देण्यासाठी लाडक्या भावाला वेठीस धरलं जात आहे. रस्त्यावर पांढऱ्या कपड्यात पोलीस दंडाच्या पावत्या फाडत आहेत, असल्या योजना देण्यापेक्षा आमच्या शेतीमालाला भाव द्या, अशी मागणीसुद्धा सरकारकडे करण्यात आली आहे."
माझी काय भूमिका? हे जलील यांना सांगितलंय : राजू शेट्टी
राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणी, इम्तियाज जलील यांची काल एकत्र भेट झाली. त्यावेळी तिसऱ्या आघाडीच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याबाबत बोलताना इम्तियाज जलील माझे खूप आधीपासूनचे मित्र आहेत, संभाजी नगरला असताना त्यांचा मला फोन आला, मी काय स्टँड घेतला आहे, त्यांना सांगितलं, असं राजू शेट्टी म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारण्यांवरही टीकेची झोड उठवली. हे सगळे लुचे बदमाश, लुटारू आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवरही टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या लुचे, बदमाश, लुटारू आहेत, त्यामुळे दोघांचा बंदोबस्त करण्यासाठी ही आता पहिली आघाडी आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.