Congress President Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. या निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागला आहे. यातच निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खरगे यांच्यासह दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन उपस्थित होते. यादरम्यान काँग्रेसच्या या तीन बड्या प्रवक्त्यांनी राजीनामे दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आता हे तिन्ही प्रवक्ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचार करताना दिसणार आहेत.
यावेळी बोलताना राजीनामा देणारे पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत. यानंतर आता काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला आहे, असे म्हणता येईल.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कठोर संघर्षानंतर मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कुठेही गेलो तरी तिथे पूर्णवेळ काम करण्याची माझी सवय आहे. पक्षातील बदलांबाबत काँग्रेस खासदार यांनी खरगे याना लक्ष्य केलं होत. यावर बोलता ते म्हणाले आहेत की, त्यांच्या मनात विचार असू शकतात. याबाबत 9,300 प्रतिनिधी निर्णय घेतील. ही घरची बाब आहे. मी एकटा करणार नाही, समितीतील सर्वजण मिळून निर्णय घेतील.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले आहे. दहा वर्षे काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला नाही, की त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला नाही. आजही राहुल गांधी उन्हात भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यांच्याशी आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी मी नक्कीच चर्चा करेन.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या धोरणानुसार राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह किंवा प्रमोद तिवारी यांच्यापैकी कोणालाही राज्यसभेत विरोधी पक्षनेते केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ABP C-Voter Survey: हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुनरागमन करणार का? जाणून घ्या लोकांचा कल