नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीए आघाडीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मोदींसह देशातील 46 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील 5 नावांवर शिक्कामोर्तब झालं असून शिवसेना शिंदे गटाच्या खासदारालाही संधी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आता ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या माजी मंत्री प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, आम्हाला पुढील काही काळासाठी धीर ठेवण्याचं सांगण्यात आल्याचं पटेल यांनी म्हटलं.
भाजपाकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पू्र्वी भारत सरकारमध्ये मंत्री राहिलो आहे. त्यामुळे, स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भाजपच्या श्रेष्ठींची काही चूक आहे किंवा नाही, असं नाही. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्या पद्धतीने त्यांना ज्या सूचना मिळाल्या, त्याच पद्धतीने आम्हालाही सूचना मिळाल्या आहेत. तुम्ही थोडे दिवस धीर ठेवा, हेही आम्हाला सांगण्यात आलं आहे. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रात जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे, तो शिवसेनेशी तुल्यबळ समजूनच आमच्याबाबत निर्णय घेतला असावा, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.
हेही खरं आहे की, आम्ही त्यांना सूचना केली आहे. मी पूर्वी कॅबिनेटमंत्री राहिल्यामुळे आज जे काही आम्हाला मिळत आहे, ते स्वीकारणं मला योग्य वाटत नाही. म्हणून, मला एवढंही सांगितलं गेलंय की, तुम्ही थोडं धीर ठेवा, असे स्पष्टीकरणही पटेल यांनी दिले. तसेच, आमच्या काही तेढ आहे, तटकरे विरुद्ध प्रफुल्ल पटेल असं काही नाही. आम्ही सगळे एकत्रच होतो, माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षाने एकमताने बसूनच ठरवला होता. त्यामुळे, हा वादाचा विषयच नाही. काही दिवसांनंतर नक्कीच विचार होणार असेल, म्हणूनच आम्हाला सूचना करण्यात आली, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. आघाडीमध्ये सगळ्यांना एकमेकांची गरज आहे, उद्या महाराष्ट्रात निवडणूक आहे. त्यासाठी सर्वांना एकत्रितपणे सामोरे जायचं आहे. त्यामुळे, आम्हाला खात्री आहे की लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातून 5 जणांना संधी
राष्ट्रपती भवनाच्या परिसरात मोठ्या थाटात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी आधी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचीही यादी तयार करण्यात आले आहे. यंदा मंत्रिमंडळात अनेक नवनिर्वाचित खासदारांना संधी देण्यात आल्याचं दिसंत आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रातून जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांच्यामध्ये ओबीसी, मराठा, एससी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. तसेच, प्रादेशिक समतोलही साधण्यात आला आहे. मुंबईतून पियुष गोयल, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, तर विदर्भातून दोन खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. मराठवाडा आणि कोकणातून मात्र कुणाच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नाही.