PM Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. यात आतापर्यंत महाराष्ट्रातील पाच खासदारांना केंद्रीय मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP Ajit Pawar Camp)  केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी मोठा दावा केला आहे.  


रोहित पवार म्हणाले की, जे नेते शरद पवार साहेबांना सोडून गेले. त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल्ल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट देण्यात आले आहे. ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली जी सील केली होती. त्यामुळं मंत्रिपद मिळालं नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले आहे. आता जे साहेबांना सोडून गेले. त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवावी लागणार, असा दावा त्यांनी केला आहे.  


फुटलेला राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा राहणार नाही


ते पुढे म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत हात धुवून घेतले. प्रफुल्ल पटेल यांची ईडीची कारवाई  संपली आहे. दादा, तटकरे यांची अजून सुरु आहे.  म्हणजे सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेल यांचा झाला. फुटलेला राष्ट्रवादी पक्ष हा आता अजित पवार यांचा राहणार नाही. आता तो भाजपचा होणार कारण एकही मंत्रिपद त्यांना मिळालं नाही.  चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्राकडून आपल्या राज्यातल्या लोकांसाठी काही गोष्टी मागितल्या. आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी काहीच मागितले नाही, असेही रोहित पवार म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांना श्रीकांत शिंदे काबील वाटत नाही का?


शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मंत्री पदासाठी शिवसेना गट नेते डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाला एकमताने संमती दिली होती. श्रीकांत शिंदे हे केंद्रीय मंत्री पदासाठी काबील असतानाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांच्याच नावाला पसंती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतीमधून “राजा का बेटा राजा नही बनेगा… जो काबील है… वही राजा बनेगा..!” हे दाखवून दिल्याची चर्चा आहे. यावरून रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीकांत शिंदे काबील वाटत नाही का? माझ्या मते श्रीकांत शिंदे काबील आहेत. आता त्यांना वाटत असेल श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपद मिळावं. जरी श्रीकांत शिंदे यांना मंत्र पद मिळत नसेल तरी त्यांच्या पक्षाच्या खासदार आणि राज्यातल्या आमदारांना त्यांचेच म्हणणं ऐकावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. 


पालकमंत्र्यांचे पुणे शहरात लक्ष नाही


पुण्यात शनिवारी विक्रमी पावसाची नोंद झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यावर रोहित पवार म्हणाले की, पालकमंत्र्यांचे पुणे शहरात लक्ष नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. याचे उत्तर पुणेकर विधानसभेच्या निवडणुकीत देतील, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मंत्रिमंडळातला सहभाग का खोळंबला? समोर आलं मोठं कारण