ठाणे : राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात ह्या जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वीच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारातील प्रचारात व्यक्तीगत टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य जोडून हल्लाबोल केला. मेरा बाप गद्दार है.. असे श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) कपाळावर लिहिलं पाहिजे, असे चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, शीतल म्हात्रे (Sheetal Mhaatre) आणि प्रियंका चतुर्वैदी यांच्या चांगलीच जुंपली आहे.
प्रियंका चतुर्वैदी यांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार पलटवार केला. तसेच, खासदारकी मिळवण्यासाठी फोटो दाखवत एकप्रकारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपच म्हात्रे यांनी चतुर्वैदी यांच्यावर केला आहे. शीतल म्हात्रे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन प्रियंका चतुर्वेदींना डिवचलं होतं. त्यानंतर, चतुर्वेदी यांनीही प्रत्युत्तर देताना दिल्लीत जाऊन मुजरा करुन खिशाची सोय केल्यांचं म्हटलं. त्यानंतर, म्हात्रे आणि चतुर्वेदी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे.
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वैदी
आम्ही कोणत्या भाषेतून किंवा कोणत्या धर्मातून जन्मालो आलो हे महत्त्वाचं नाही आहे. मराठीचा सन्मान करण्यासाठी किंवा मराठी माणसाच्या हितासाठी आवाज उचलण्यासाठी मराठी यायला पाहिजे अशी कोणती अट ही नाही आहे. तुम्ही अजूनही ह्या काळात मराठी अमराठीची तुलना करत आहात, यातूनच तुमची बुद्धी किती तुल्लक विचारांची आहे हे समजते, असे प्रत्युत्तर प्रियंका चतुर्वैदी यांनी दिले होते. तसेच, माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे, तर मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी आवाज उठवणार. मग मी अमराठी असली तरी, पण तुम्ही तर मराठी घरातच जन्माला आलात ना, मग कधी तरी मराठी जनतेच्या अस्मितेसाठी आवाज उठवला आहे का? पण हे तुम्हाला कुठे समजतं, तुम्ही फक्त दिल्लीत जाऊन मुजरा करून आपल्या खिशाची सोय केलीत. 50 खोकेच्या लालचेपोटी तुम्ही आपल्याच ताटात थुंकून दुसऱ्यांच्या चरणी नतमस्तक झालात, असे म्हणत प्रियंका चतुर्वैदी यांनी शीतल म्हात्रेंवर गंभीर आरोप केले होते. त्यावर, म्हात्रे यांनीही जशास तसे उत्तर देत पलटवार केला आहे.
शीतल म्हात्रेंचं प्रत्युत्तर
काँग्रेसमधून मागच्या दाराने खासदार होण्यासाठी उबाठात आलेल्या लाचार 'चतुर' ताई आम्हाला 'मराठी अस्मिता' शिकवणार?. जन्म महाराष्ट्रात होऊनसुद्धा एवढ्या वर्षात तुम्हाला मराठी भाषा येत नाही, ना नीट बोलता. लिहून पण आता हे दुसऱ्याकडून घेतलय ज्यात असंख्या चुका, यापेक्षा दुर्दैव ते काय?, असा सवाल शितल म्हात्रे यांनी विचारला होता. तसेच, बाकी जाऊ दे, दाओसला कशाला गेलेलात? आणि मागच्या आठवड्यात तुम्ही कुठे मुजरे करुन हुजरेगिरी केलात, ते आधी सांगा, असे प्रश्नही म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदींना विचारले आहेत. तसेच, ''बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे, ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे'' असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. ''पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे'' असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेतील दोन्ही पक्षाच्या महिला नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय वादातून त्यांची टीका व्यक्तीगत पातळीवर पोहोचल्याचं दिसून येत आहे. या दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरुन चांगलीच जुंपली आहे.