Amol Kirtikar Rally : मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटचा (1993 Bomb Blast) आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील (Mumbai North West Seat) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपनं केला आहे. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे, असंही भाजपनं म्हटलं आहे. 


मुसा उर्फ बाबा चव्हाण हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसून आला. या प्रचार रॅलीचा व्हिडीओ भाजपच्या हाती लागला असून भाजपनं या व्हिडीओवरुन थेट उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे. तसेच, त्यांचं असं म्हणणं आहे की, उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत की, 1993 वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्यासोबत आहे? असे प्रश्न भाजपच्या वतीनं ठाकरेंना विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापलेले होते आणि त्यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली होती. पण तुम्ही आता 1993 च्या आरोपींनाच सोबत घेतलंय. तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचंय? असा प्रश्नही भाजपनं विचारला आहे. 


मुंबईकरांसाठी आजचा काळा दिवस : केशव उपाध्ये


भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये बोलताना म्हणाले की, "मुंबईकरांसाठी आजचा काळा दिवस आहे. ज्या मुंबईनं भरभरुन प्रेम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलं. त्या उद्धव ठाकरेंनी आज भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे की, ते मुंबईकरांसोबत आहे की मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांसोबत आहेत? कारण 1993 चा बॉम्बस्फोट मुंबईकर आजही विसरलेले नाहीत. आजही मुंबईकर त्या बॉम्बस्फोटाच्या आठवणींनी भावूक होतात, दुःखी होतात. कारण मुंबईकरांनी त्या दंगली आणि बॉम्बस्फोटात खूप काही गमावलं आहे. अशावेळी मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येतेय. आज त्यांचा आत्मा तळमळत असेल. कारण त्यावेळी बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली की, मुंबईकरांचं रक्षण आम्ही करु, त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिले होते की, आणि आज मतांच्या राजकारणासाठी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे अशा आरोपींसोबत जात असतील, त्याला प्रचारात घेत असतील तर हा मुंबईकरांसोबत झालेला धोका आहे. काळा दिवस आहे."


उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती : चंद्रशेखर बावनकुळे 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट केलंय. ते म्हणाले की, "1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला। आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे.  


"हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 93 च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.