CM Eknath Shinde On Aaditya Thackeray : ठाण्यातून निवडणूक लढण्याच्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. "लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. ठाण्यातील जनक्षोभ मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी "मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार" असं जाहीर आव्हान दिलं होतं.
"आज ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलोय, कौतुक करायला आलोय. कसा माणूस असेल. कशी नीती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं काळीज असेल, कस हृदय असेल. ते ठाण्याला स्वत:चा बालेकिल्ला मानायचे, आता मानत नाही. कारण मी त्यांना सांगितलं मला चॅलेंज द्या, मी ठाण्यातून निवडणूक लढवून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का?" असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया भाजप आणि शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरही भाष्य केलं.
'ठाण्यात काल नैराश्य पाहायला मिळालं'
मुख्यमंत्री म्हणाले की, "माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, त्यामुळे शिवसेना मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आले आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांबद्दल बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. काल ठाण्यात नैराश्य पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होते, हे त्यांच्या बोलण्यावरुन कळतं. खरं म्हणजे मला मुख्यमंत्री की गुंडमंत्री, देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणाले, अरे ज्यांच्या काळात किती मोठे कांड झाले, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले. गृहखात्याचे धिंडवडे निघाले. कोणी विरोधात बोललं, त्यांना जेलमध्ये टाकलं, नारायण राणे यांना जेवणावरुन उठवलं, कंगना रनौतचं घर तोडलं, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकलं, केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं, हनुमान चालिसा बोलणाऱ्या नवनीत राणा, रवी राणा यांना जेलमध्ये टाकलं, किती गुंडगिरी होती, ही गुंडगिरी ते विसरले का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलं नाही. आम्ही मर्यादा सोडणार नाही, बाळासाहेबांनी आम्हाला संस्कृती शिकवलेली आहे. पण काल जे पाहिलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ते उद्धट ठाकरे किंवा उद्ध्वस्त ठाकरे म्हणाले नाहीत. त्यांनी संयम बाळगला. ही संस्कृती आहे, परंपरा आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे हा बिलकुल मिळणार नाही. अडीच वर्षात त्यांनी काय केलं, सात-आठ महिन्यात आम्ही काय केलं हे जनता जाणते. आम्हालाही त्यांच्यापेक्षा तिखट बोलत असतो. पण आम्ही मर्यादा पाळत असतो. योग्य वेळी सर्व बोलू.
वडिलांचं नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे : एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या कामातून कर्तृत्व सिद्ध करुन दाखवलं आहे. जर वडिलांची पुण्याई, नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे? काय म्हणून तुम्ही बोलता, कोणावर बोलता, या महाराष्ट्राची जनता कामाला महत्त्व देते, आरोपांना नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनी लगावला.
संबंधित बातमी