ठाणे: आज ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. आदित्य ठाकरे आज ठाण्यातील जनक्षोभ मोर्चाला संबोधित केलं. 


रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी आज ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी हे राज्य आज अंधारात गेलं असल्याचं सांगत गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवणारच असं ते म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, "एक गद्दार सुप्रिया सुळे यांना जाहीर शिव्या देतोय, त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवलं जातंय. दुसरा एक गद्दार सुषमा अंधारे यांना शिव्या दिल्या, त्याला मांडीला मांडी लावून बसवलं जातंय. आज रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला हे दुर्दैवी आहे."


हे सरकार काही महिन्यांचं किंवा काही दिवसाचं नाही तर अवघ्या काही तासांचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवर यावेळी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "आमचं सरकार आल्यानंतर या सरकारची चमचेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आणि त्यांना तुरुंगात पाठवणार. आज रोशनी शिंदे या रुग्णालयात आहेत, पण त्यांच्या रुमच्या बाहेर पोलिस बसवण्यात आले आहेत. त्या बऱ्या झाल्या, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात येईल. हे असं सुरू आहे राज्य. ठाण्यामध्ये एका महिलेवर अन्याय होतोय."


हिंमत असेल तर मातोश्रीवर या; सुषमा अंधारे याचं बावनकुळेंना आव्हान


बावनकुळे म्हणतात की उद्धव ठाकरेंना घरातून बाहेर पडू देणार नाही, हिंमत असेल तर त्यांनी येत्या 48 तासात मातोश्रीवर या, मग बघू असं जाहीर आव्हान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. बावनकुळेंमध्ये उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याची ताकद असेल तर त्यांचं तिकीट फडणवीसांनी का कापलं? असा सवालही त्यांनी विचारला.


या सभेनंतर आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली.