Chhatrapati Sambhaji Nagar News : रामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेल्या दोन गटातील वादावर सकल हिंदू एकीकरण समितीने पत्रकार परिषद घेऊन आता नवीन दावा केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) हे त्या रात्री राममंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा चुकीची असून, ते स्वत:ला वाचवण्यासाठी मंदिरात गेले होते अशी माहिती सकल हिंदू एकीकरण समितीकडून देण्यात आली आहे. तर त्या दिवशी झालेला राडा आपसातील दोन गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदू-मुस्लिम वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. सकल हिंदू एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (4 मार्च) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना जंजाळ म्हणाले की, बुधवारी रात्री किराडपुरा येथे झालेला वाद आपसातील दोन गटांतील लोकांमुळे झाला होता. सुरवातीला झालेला वाद तत्काळ मिटवला गेला होता. तर त्यावेळी तिथे उपस्थित असलेले खासदार जलील यांना त्यांचाच जमाव दगड मारायला लागला, म्हणून ते राममंदिर परिसरातील पोलिस चौकीत पळाले होते. तसेच राममंदिर पोलिसांनी वाचवले, जलील यांनी नाही. तर राडा सुरु असताना आपण जलील यांना आपण फोन करून, ‘तुम्ही मंदिरात काय करताय? तिथे काय झालंय?’ हे मी विचारले तर, ते म्हणाले, ‘मंदिराला धक्का नाही. मात्र बाहेर वाद सुरूय, असे जलील यांनी उत्तर दिले होते असेही जंजाळ म्हणाले.
आरोपींची धरपकड सुरु...
दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत 80 पेक्षा अधिक लोकांची ओळख पटली असून, 42 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींच्या शोधात तब्बल 22 पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, त्यानुसार आरोपींना अटक करण्यात येत आहे. तर अनेक आरोपी भूमिगत झाले आहेत. परंतु जिल्ह्याबाहेर गेलेल्या आरोपींना देखील शोधून बेड्या ठोकण्याचे काम पोलीस पथकाकडून सुरु आहे. तर लवकरच मोठ्याप्रमाणावर आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :