Sanjay Raut Full PC: नवी दिल्ली : तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना उन्माद चढलाय, असं म्हणत ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी लोकसभेतील खासदारांच्या निलंबनावरही भाष्य केलं. दिल्लीतल्या मंदिराचं स्मशान करुन तुम्ही अयोद्धेत जाऊन राम मंदिरात पुजा करणार असाल, तर तो राम तुम्हाला पावणार नाही, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारला थेट फटकारलं आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रेशीमबागेत गेल्याबाबत प्रश्न विचारताच, रेशमाचे किडे घेऊन गेले असतील, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "इंडिया आघाडीची काल बैठक झाली, त्या बैठकीत चर्चा झाली. मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही. भविष्यात 2024 मध्ये तुमच्यावर (भाजप) निराश आणि वैफल्यग्रस्त होण्याची वेळ येईल, हे स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदींनी काल नेत्यनाहू यांच्याशी चर्चा केली. माझं आव्हान आहे त्यांना, तुम्ही नेत्यनाहूंशी तिथल्या निवडणुकांच्या प्रक्रियेबाबत चर्चा करा. इज्राइलमधून आपल्या देशात ईव्हीएम हॅकिंगचं तंत्र आलं आहे. पण, तिथे निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. अमेरिकेत निवडणुका बॅलेट पेपरवर घेतात. तुम्ही महाशक्तीबाबत बोलता, महाशक्ती लोकशाहीत चिटींग करुन नाही होत. तुमच्या महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे." ते पुढे बोलताना म्हणाले की, हुकूमशाही आहे, पण आमची अशी मागणी आहे की, ईव्हीएमसोबत जी स्लिप येते, त्या व्हीव्हीपॅटचं 100 टक्के काउंटिग व्हावं, अशी आमची मागणी आहे. 


...तर तो राम तुम्हाला पावणार नाही : संजय राऊत 


"आम्ही लढत राहू, लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पुजा करायची, हे ढोंग आमच्याकडे नाही. राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतील संसद, यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. जर दिल्लीतल्या मंदिराचं स्मशान करुन तुम्ही अयोद्धेत जाऊन राम मंदिरात पुजा करणार असाल, तर तो राम तुम्हाला पावणार नाही.", असं संजय राऊत म्हणाले


तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना उन्माद चढलाय : संजय राऊत 


"141 खासदारांचे निलंबन होणं, ही ऐतिहासिक घटना नसून बेशरम पणाचं लक्षण आहे. कालच त्यांचं भाषण मी ऐकलं संसदीय दलाच्या बैठकीतील. भाजप आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना उन्माद चढला आहे.", असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 


"इंडिया आघाडीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसनं एक समिती तयार केली. उद्धव ठाकरे जेव्हा राहुल गांधी आणि खर्गेंना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की , शरद पवार आणि आमच्यात कमालीचा समन्वय आहे. पण काँग्रेसबाबत मात्र कायम दिल्लीत विचारावं लागतं. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की, काँग्रेसच्या जागांबाबतची चर्चा दिल्लीतच व्हावी. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत जागावाटप होईल. दिल्लीत ठरेल. उद्धव ठाकरे पुन्हा दिल्लीत येऊ शकतात. दिल्ली काय कोणाची जहागीर आहे का?", असंही संजय राऊत म्हणाले.