Bihar Politics: जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. येत्या 24 तासांत बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकते. जेडीयू आणि भाजपमध्ये तणाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आणि काँग्रेसने आपापल्या विधीमंडळ पक्षांची बैठकही बोलावली आहे. जेडीयू आणि भाजपची युती तुटू शकते आणि त्यानंतर जेडीयू काँग्रेससोबत जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असून, पक्ष भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 


याच दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीयूने गेल्या महिन्यात आरसीपी सिंह यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरसीपी सिंह यांनी मोदींच्या मंत्रिमंडळाचा निरोप घेतला. तेव्हापासून आरसीपी सिंह पक्षावर नाराज होते. आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयू आणि भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहे.


आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, जेडीयूने भाजपसोबतची युती पूर्ण प्रामाणिकपणे केली आहे. जेडीयूसोबतच्या युतीला कुठलाही संसर्ग होऊ न देण्याची जबाबदारीही भाजपची आहे. पण भाजपकडून जे संकेत मिळत आहेत ते योग्य नाहीत. भाजपची ही भूमिका युतीच्या भवितव्याची चिंता वाढवणारी आहे. काही लोक (भाजपचे) जेडीयूविरोधात कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बिहार सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटणार? भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांचा राजीनामा
Ramdas Athawale :  राज्य मंत्रिमंडळात आम्हालाही एक मंत्रीपद मिळावं!, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी तेथून बाहेर पडायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर जयंत पाटील यांचं टीकास्त्र