jayant patil on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत शेवटच्या स्थानी स्थान दिल्यामुळे भाजपवर टीका केली जात आहे. रोहित पवार यांच्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर टीका करताना मोदींची तुलना थेट औरंगजेबाबरोबर केली आहे. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज यांना दुसऱ्या ओळीत स्थान देण्यात आलं होतं त्यामुळे शिवाजी महाराज यांनी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडणं गरजेचं होतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता पुण्यातील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी जयंत बैठक पार पडली होती. आगामी महापालिका निवडणुका, बदललेली प्रभाग रचना आणि राजकीय विषयवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्याशी चर्चा झाली. बैठक झाल्यानतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारी टीकास्त्र सोडलं. 


सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'जर भारतात न्याय शिल्लक असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात दिसून येईल. नसेल तर ते ही निकालातून कळेलच.' एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना पाटील म्हणाले की, औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजाना दुसऱ्या रांगेत उभ केलं तर त्यांनी ती सभा सोडली. मुख्यमंत्र्यांनी याची आठवण ठेवावी. मी केवळ उदाहरण सांगितलं. मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिली नाही. ती सभा मोदींची होती मला नवा वाद उभा करायचा नाही . प्रोटोकॅाल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट असते.  


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची (NITI Aayog) सातवी बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना योग्य स्थान न दिल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावलाय.


काय म्हटले आहे अमोल मिटकरी यांनी
"दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा  फोटो. शिंदे साहेब वाईट वाटले.