Ramdas Athawale : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आम्हालाही एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.  ते आज उल्हासनगरमध्ये आले होते. दलित पँथरला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. 


 उल्हासनगरच्या रिजन्सी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथरमध्ये लढलेल्या, शहीद झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. दलित पँथरमुळेच आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले, असं म्हणत आठवले यांनी यावेळी पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. उल्हासनगरचे आरपीआय जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी काँग्रेसच्या महागाईच्या आंदोलनावर टीका केली. काँग्रेसनं ७५ वर्षांपैकी ६०-६५ वर्ष देश चालवला, त्यामुळे आजच्या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार असून मोदी सरकारकडून देशाच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचं आठवले म्हणाले. तर यावेळी राज्य सरकारमध्ये आपल्याला एका मंत्रिपदाची अपेक्षा असून आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी केल्याचंही आठवले यांनी सांगितलं. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातले वाद मिटले असून पुन्हा वाद झाल्यास आपण ते वाद मिटवू, अशी भूमिका आठवले यांनी घेतली.


नव्या सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रीपद मिळावं!


नवीन सरकारमध्ये एक मंत्रीपद आपल्याला मिळावं, अशी अपेक्षा आहे, असं यावेळी रामदास आठवले म्हणाले. मागच्या वेळेला आम्हाला महायुतीच्या माध्यमातून एक मंत्रीपद मिळालं होतं. यावेळेला एक मंत्रीपद मिळालं पाहिजे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्रीपदासोबतच महामंडळाचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, संचालकपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या आहेत. अशा सगळ्या कमिट्यांवर आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. आपण या मागण्यांचा नक्कीच विचार करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.


...तर राणे-केसरकरांचा वाद मिटवू..


नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या वादाबद्दल आठवले यांना विचारलं असता, या दोघांमध्ये समेट झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचं जमत नव्हतं. पण आता दीपक केसरकर यांनी जाहीर केलं आहे, की आमचा आता नारायण राणे यांच्याशी वाद नाही, हा वाद मिटलेला आहे. जर पुन्हा त्यांचा असा काही वाद झाला, तर मी मिटवण्याचा प्रयत्न करेन, असं रामदास आठवले म्हणाले.


 दलित पँथरमुळेच आम्हाला हे दिवस मिळाले आहेत


रामदास आठवले यांनी यावेळी दलित पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. दलित पँथरने देशात, महाराष्ट्रात जबरदस्त पद्धतीची आंबेडकरी मूव्हमेंट चालवली. दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रखर लढा दिला. आज या चळवळीला ५० वर्ष पूर्ण होत असताना अनेक शहीद झालेले कार्यकर्ते, चळवळीत योगदान असलेले दिवंगत कार्यकर्ते यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आल्याचं आठवले म्हणाले. दलित पँथर हे मोठं संघटन होतं. त्यानंतर भारतीय दलित पँथर चालवून आम्ही रिपब्लिकन ऐक्यात सहभागी झालो, आणि आता रिपब्लिकन पक्ष आम्ही चालवतो आहोत. मात्र दलित पँथरमुळेच आम्हाला हे दिवस मिळाले आहेत, असं प्रांजळ मत आठवले यांनी व्यक्त केलं.