नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाकडून सादर करण्यात आलेली राजकीय पक्षांच्या संसदेतील कार्यालयांच्या फाईलला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी मंजुरी दिली आहे. ओम बिर्ला यांच्या निर्णयानंतर नव्या संसद भवनात(New Parliament) कार्यालय मिळवणारा पहिला पक्ष तेलुगु देसम पार्टी (TDP) ठरला आहे. टीडीपी सध्या एनडीएमध्ये असून त्यांना नव्या संसदेत पहिलं कार्यालय मिळालं आहे. याशिवाय आम आदमी पार्टीला देखील संसदेच्या परिसरात कार्यालय मिळालं आहे, मात्र ते जुन्या संसद भवनात मिळालं आहे. 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पार्टी  हा पक्ष केंद्रात एनडीए सरकारमध्ये सहभागी आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला संसदेत पहिल्यांदा कार्यालय मिळालं आहे. 


नव्या संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेची कार्यवाही सुरु झाल्यानंतर जुन्या संसदेच्या इमारतीचा वापर संविधान सदन म्हणून केला जात आहे. भाजप आणि काँग्रेस या मोठ्या राजकीय पक्षांची कार्यालयंय संविधान सदनमध्ये आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य संख्येच्या आधारे संबंधित राजकीय पक्षांना   संसदेत कार्यालय दिलं जातं. 


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी 11 कार्यालयांचं वाटप केलं. बिहारमधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयूला संविधान सदनमध्येच जागा देण्यात आली आहे. त्यांना दोन खोल्या मिळाल्या आहेत.


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोणतं कार्यालय मिळालं? 


शिवसेना एकत्र असताना त्यांना रुम क्रमांक 128 दिलेली होती. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खोली क्रमांक 128 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 128-अ ही खोली देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला देखील संसदेत कार्यालय मिळालं आहे. सर्व राजकीय पक्षांना नव्या संसद भवनात कार्यालय मिळणं अपेक्षित आहे. मात्र, संविधान सदनमध्ये मोठी जागा उपलब्ध असल्यानं भाजप आणि काँग्रेस यांच्या सारख्या पक्षांनी नव्या संसदेतील कार्यालयाऐवजी संविधान सदन मधील जागेला प्राधान्य दिलं आहे. 


दरम्यान, 2024  च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएला पुन्हा सत्ता मिळाली आहे.  2019 ला एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला पुन्हा तशी कामगिरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत करता आलेली नाही. भाजपला 240 जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसला 99 जागांवर विजय मिळाला.  भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी जदयू आणि टीडीपीचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 7 खासदारांचा पाठिंबा देखील महत्त्वाचा आहे. 


इतर बातम्या : 



Maharashtra Politics : लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'NCP', तर शिवसेनेचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख