पुणे: राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यामधील चर्चा जवळपास फिस्कटल्याचं दिसत असताना आता दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रश्न विचारत टीका केलीय.संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत, आम्ही 100 पाऊलं पुढे चाललोय, पण तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा असा टोलाही त्यांनी लगावला. 


संजय राऊतांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असून अकोल्यातून त्यांनी आपल्याला पाडण्याचा कट रचला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावर आता सुषमा अंधारे यानी काही प्रश्न विचारले आहेत. 


सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना प्रश्न


मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही? काँग्रेसशी पटत नाही, पण त्यांना तुम्ही बोलावलं. आम्ही आधी 4 नंतर 5 जागा दिल्या होत्या. आम्ही 100 पावलं चाललो, तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती?


महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, हे फक्त जाणूनबुजून दाखवलं जातंय. छोटे मोठे वाद होते ते मिटतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सांगलीसाठी काँग्रेस इच्छुक आहे हे सर्वश्रुत आहे, पण अकोला आणि रामटेकची जागा काँग्रेसला गेल्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेकडे आल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. 


ठाण्यात दस्तुर खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्म भरावा, ठाण्याची जागा आम्हीच निवडून आणू असं सुषमा अंधारे यांनी खुलं आव्हान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला दिलं. स्मृती इराणी, कंगना राणावत, नवनीत राणा हे चित्रपट क्षेत्रातून आलेत, त्यामुळे व्यवसायावरून कोणी कोणावर टीका करू नये असं त्या म्हणाल्या. 


अजित पवार यांनी शोध घ्यावा की विजय शिवतारे यांचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे. विजय शिवतरे यांचे स्क्रिप्ट रायटर अजित पवारांच्या आजूबाजूला बसलेले आहेत का हे पाहावं. आता विजय शिवतारे यांचा यू टर्न म्हणजे "तारे जमीन पर" अशातला प्रकार आहे. 


काय म्हणाले होते संजय राऊत? 


या देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण सरकारकडून सुरू असलेला भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही तर आंबेडकरांची आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. आंबेडकर यांचे विचार आणि आमचे एक आहेत पक्के आहेत. 


काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 


संजय, किती खोटं बोलणार?तुमचे आणि आमचे विचार एकच आहेत तर आम्हाला बैठकीला का बोलवत नाही? 6 मार्चला फोर सीझन्स हॉटेलातल्या बैठकीसाठी आमच्या प्रतिनिधींना का आमंत्रण आलं नाही. आजही वंचितला आमंत्रणाशिवाय कशी काय बैठक घेता? तुमचे आम्ही सहकारी, तरी पाठीत खंजीर मारण्याचं काम केलंत. सिल्व्हर ओकवरील बैठकीत तुमची काय वागणूक होती? अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार देण्याचं आपण बोललात हे खरं नाही का? एकीकडे आघाडीचा भ्रम, दुसरीकडे आम्हालाच पाडण्याचा कट रचता?


ही बातमी वाचा: