Sushma Andhare on Yogesh Kadam: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंधारे यांनी मंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) भावाला सचिन बन्सीलाल घायवळ (Sachin Ghaywal) याला शस्त्र परवाना दिला, जो कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे, असा दावा केला आहे.
सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शस्त्र परवाना देणे म्हणजे थेट गुन्हेगारीला अभय देण्यासारखे आहे. या प्रकरणात मंत्री कदम यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गुन्हेगाराला बळ दिले, असा आरोप करत अंधारे म्हणाल्या, "त्यांनी पदाचा गैरवापर करत गुंडाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही, असे म्हणत त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Sushma Andhare on Sachin Ghaywal: सचिन घायवळवर मकोकाअंतर्गत गुन्हे
सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, काल कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मकोकाअंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता.
Sushma Andhare on Yogesh Kadam: कदमांनी गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : सुषमा अंधारे
तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या. 1) कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे. 2) दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302 , 307, 343, 147, 148 , 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(१), 3 (1) (२) , 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. 3) शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Yogesh Kadam : काय म्हणाले योगेश कदम?
दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे योगेश कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा