अहमदनगर:  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवीन खुलासा करत तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घोसाळकरांची हत्या करून मॉरिस नोरोन्हा (mauris noronha) याने देखील आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पण आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारुन घेऊ शकतो का? असा सवाल उपस्थित करत या हत्येमध्ये वेगळंच काहीतरी असण्याची शक्यता अंधारे (Mehul Parekh) यांनी बोलून दाखवली. हत्या करण्याआधी फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि घोसाळकर यांच्याभोवती मृत्यूचे सावट दिसत नाही. कदाचित घोसाळकरची (Abhishek Ghosalkar) हत्या मॉरिसनी केलेली ही नसावी. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेहुल नावाचा व्यक्तीदेखील दिसत आहे.  या हत्येच्या संबंधी सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गृह विभागावर निशाणा साधला आहे.



देवेंद्र फडणवीसांना सुषमा अंधारेंचा टोला


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या पत्नीचे संरक्षण करता येत नसल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या राज्यात गृहमंत्र्यांची पत्नी सुरक्षित राहत नाही तर सर्वसामान्यांच्या घरातील महिला कशा सुरक्षित राहतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला त्यावेळेला गंभीर कलम लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली  तरीसुद्धा संबंधित माणसावर 307 कलम लावण्यात आला पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा हल्ला होऊनही गुन्हा दाखल केला नाही,  याचा अर्थ सत्ताधाऱ्यांची जर माणसं असतील तर त्यांना खुलेआम छूट दिली जाते. नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार कमी संबंध आलाय, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी फडणवीसांवर टीका केली. 


नारायण राणे यांना टोला


भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली असून या यादीमध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आयात उमेदवारांची नावे असून याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या  सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्हाला आनंद आहे काही काळ सहकारी म्हणून  एकत्र राहिलेले ते लोक आहेत मी त्या सर्वांचे अभिनंदन करते. मात्र, नारायण राणे यांचे 'नारायण भाऊ' असे नाव घेत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचा टोला लगावला. मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी न देता आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले आहेत.



ब्रिटिशांच्या काळातही शेतकऱ्यांना इतकी वाईट वागणूक मिळाली नव्हती: सुषमा अंधारे


हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर दरोडेखोरांच, गुंडगिरीचे आणि ईडी सीबीआयच्या दडपशाहीचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे ही आपली अंधश्रद्धा आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. ब्रिटिशांच्या काळात देखील शेतकऱ्यांना इतक्या वाईट पद्धतीने वागणूक मिळाली नसेल. मात्र, आता शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत, अश्रूधुर सोडला जात आहे, असे टीकास्त्र अंधारे यांनी सोडले.


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार आपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. मात्र, या निकालांची सर्वसामान्य नागरिकांना फार उत्सुकता आहे असं मला वाटत नाही कारण स्वायत्त यंत्रणेचा भाजपकडून आणि गैरवापर केला जात आहे त्यामुळे या यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडालेला आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटले.  कधी हिंदू-मुस्लीम तर कधी ओबीसी-मराठा, असे सरकार भांडण लावत असल्याचा आरोप करत स्वायत्त संस्थांचा गैरवापर थांबायला हवा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. 


 


आणखी वाचा


'भाजपाने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवली, वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं'; विनायक राऊतांचा टोला