मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांकडून नित्यनियमाने एकमेकांवर टीका-प्रतिटीका, शाब्दिक वार केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांचे काका शरद पवार (Sharad Pawar) यांना पाडण्याची भाषा केली होती. अजितदादांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक जुना व्हीडिओ ट्विट करत अजित पवार (Ajit Pawar) यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी अजित पवार यांना आपल्या काकांचा किती अभिमान होता, तेच अजितदादा आता त्याचा काकांना पाडण्याची भाषा करत आहेत, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मा. अजित काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलीकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव! आणि हो! जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातो? या का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल, असा सल्ला रोहित पवार यांनी अजित पवारांना दिला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अजित पवार हे शरद पवार गटाविरोधात आणखी आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजितदादांनी शरद पवार यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यांनी म्हटले होते की, सका पाटलांचा प्रचार करताना जॉर्ज फर्नांडिस 'पापापा' असं लिहून प्रचार करत होते. म्हणजेच 'पाटलाला पाडलं पाहिजे'. आता 'काका का' असे लिहून प्रचार केला पाहिजे, अशी भाषा वापरत अजितदादांनी शरद पवारांना थेट आव्हान दिले होते.
जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
अजित पवार यांच्या वक्तव्याला जितेंद्र आव्हाडा यांनीही प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. "कारण पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता? माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस २०१९ सारखी माफी नाही .गद्दारांना माफी नाही !", असे खडे बोल जितेंद्र आव्हाडांनी सुनावले होते.
आणखी वाचा