Suresh Gopi First BJP MP From Kerala: नवी दिल्ली : लोकसभा निकालामध्ये (Lok Sabha Election Result 2024) बहुमत मिळालेल्या एनडीएनं सरकार (NDA Government) स्थापन केलं असून तिसऱ्यांदा मोदींनी पंतप्रधान (PM Narendra Modi) पदाची शपथ घेतली. यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलवणारे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी वर्णी लागली. रविवारी (काल) पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेल्या सर्वच खासदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये सुरेश गोपी हेदेखील होते. पण कालच शपथ घेणारे सुरेश गोपी आता आपल्या पदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना खुद्द सुरेश गोपी यांनी याबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, मला मंत्रिपदाची अपेक्ष नव्हती. त्यामुळे मला लवकरच मंत्रिपदावरुन मुक्त केलं जाईल, अशी अपेक्षा आहे. 


केरळमधील भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते मंत्रीपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, मी मंत्रिपदाची अजिबातच मागणी केलेली नाही आणि लवकरच या पदावरून मुक्त होईल अशी आशा आहे." गोपी यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


मंत्रिपद सोडण्याचं कारण सांगताना ते म्हणाले की, मी चित्रपट साईन केले आहेत आणि ते मला करायचे आहेत. पण मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करेन. दरम्यान, सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि केरळमधील भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपलं नाव नोंदवलं. सुरेश गोपी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा 74 हजार 686 मतांनी पराभव केला.


खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय : सुरेश गोपी 


सुरेश गोपी बोलताना म्हणाले की, "खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे. मी काहीही मागितलं नाही, मी म्हणालो की, मला या पदाची गरज नाही. मला वाटतं की, मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहीत आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगलं काम करेन. मला माझे चित्रपट कोणत्याही परिस्थितीत करायचे आहेत." 


दरम्यान, यंदाच्या लोकसभेत ज्या मतदारसंघातून सुरेश गोपी विजयी झाले आहेत. ती जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेली होती. सुरेश गोपी लोकसभा खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे खासदारही होते. 2016 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2022 पर्यंत होता. 


 सुरेश गोपी यांनी अभिनय क्षेत्रातही उमटवलाय ठसा


सुरेश गोपी मूळचे केरळमधील अलाप्पुझा येथील आहे. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांनी कोल्लममधून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आहे. इंग्रजीमध्ये मास्टर्स केलं आहे. सुरेश गोपी यांनी अभिनय क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सुरेश चित्रपटांशीही संबंधित आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सुरेश गोपी यांनीही अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 1998 मध्ये आलेल्या कालियाट्टम या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांनी एक टीव्ही शो देखील होस्ट केला आहे.