Suresh Dhas on Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चार मार्चला मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी या दोघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला. आता मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडीकडे तक्रार करणार आहेत. 


तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा सुरेश धस यांनी दावा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. ‘डीएपी’त 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली, तर 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढले. लोकायुक्त कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल (एसआयटी) स्थापन करून चौकशी करा. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी ‘जीआर’ निघाला. हे सर्व ‘डीबीटी’ने द्यावे, असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा, असे आदेश काढल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. 


सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार


यानंतर आता सुरेश धस यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आहे. कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस  कृषी विभागातील घोटाळ्याबाबत ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत. कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीत.  



आणखी वाचा 


Santosh Deshmukh Case: हातपाय तोडा, पण मला मुलांसाठी जगू द्या रे...; संतोष देशमुखांची विनवणी, पण आरोपी मारतच राहिले!