Suresh Dhas Majha Katta : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चार मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत 'माझा कट्ट्या'वर मोठं वक्तव्य केलंय.
सुरेश धस यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. पण धनंजय मुंडे यांच्याबाबत तुमच्या काय भावना आहेत? असे विचारले असता सुरेश धस म्हणाले की, मला धनंजय मुंडेंचा राग पण येतो आणि कीव पण येते. काय होतास तू आणि काय झालास तू? कुणीकडे होता, राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी तुमच्याकडे दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला एवढा मान दिला होता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होतात. 2019 नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेलात, हे कशासाठी? सुदैवाने अजून हत्या प्रकरणात त्यांचा नंबर आलेला नाही. परंतु सायबर क्राईमचे तज्ञ तपासणी करणार आहे. तज्ञांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यावेळेस काही घडू नये, असे त्यांनी म्हटले.
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जातील
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतील का? असे विचारले असता सुरेश धस म्हणाले की, असे मला वाटत नाही. परंतु सायबर क्राईमचे तज्ञ सीडीआर तपासणार आहेत. दुर्दैवाने त्यात ते कुठे सापडू नयेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. जर सापडले तर ते सरळसरळ आकाच्या शेजारी जातील, असे त्यांनी म्हटले.
संतोष देशमुखांना बऱ्याच गावात नेऊन मारले
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले नव्हते, त्यावेळी तुम्ही हत्या कशी झाली याचे हुबेहूब वर्णन विधानसभेत केले होते, ते कसे केले? याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, आपण कुठल्याही लोकांमध्ये गेल्यावर ते काय सांगत आहेत हे आपण नीट ऐकले पाहिजे. त्याचे पॉईंट्स टिपून घेतले पाहिजे. या घटनेत माझ्या पहिल्या दिवशी लक्षात आले की, घटना कशी घडली आहे. मी तिथे आजूबाजूच्या दहा गावात गेलो होतो. दहा गावातल्या लोकांना घटनेबाबत विचारले होते. संतोष देशमुख यांना मारेकर्यांनी बऱ्याच गावात नेऊन मारले. ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सगळ्यांनी वर्णन करून मला सांगितलं. लोकांनी सांगितलेले राजकारण्यांच्या डोक्यात लगेच बसले पाहिजे. त्यामुळे मी तसे वर्णन केले आणि तसेच वर्णन फोटोमध्ये दिसून आले, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा