Gulabrao Patil : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे. त्यावेळी विरोधक बाळासाहेबांवर टीका करायचे. परंतु आताच्या घटना बघितल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे, असे म्हणत आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण काढली. ते जळगाव (Jalgaon News) महापालिकेत जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day 2025) आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
महिला सुरक्षेसाठी (Women Safety) सरकार कटिबद्ध असून, महिलांनी देखील आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहावे. महिला सुरक्षेसाठी एसटी महामंडळ विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार असून, आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवले जातील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने मॉल उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला सशक्तीकरण (Women empowerment) आणि सुरक्षा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, भविष्यात महिलांसाठी अधिक सुविधा आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची आठवण करून देत गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेवर बोलताना महिलांनी आपल्या पर्समध्ये लाली पावडर न ठेवता मिरचीची पूड व चाकू ठेवायला हवा, असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यावरुन त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता खरोखर बाळासाहेब म्हणाले होते तसे करण्याची वेळ महिलांवर आली आहे. आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी वाघीण झालं पाहिजे. आजची नारी अबला न राहता ती सबला झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांनी आत्महत्या न करता त्यावर उपाय शोधावा टोकाची भूमिका घेऊ नये, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या