मुंबई (Mumbai) : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांच्या सामना पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. "सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगेल असं मला वाटत नाही. या अफवा आहेत," असं संजय राऊत म्हणाले. तसंच कोणीही निवडणूक लढली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.


पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.


जिंंकणार तर....


याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "मला नाही वाटत असं होणार. या अफवा सुरु आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं, आम्ही सुद्धा राज्य केलं आहे. आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहित आहे आणि बारामतीचे राजकारण सुद्धा माहित आहे. कुणीही निवडणूक लढली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार."


आदित्य ठाकरेंमुळेच मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 10 दिवसीय परदेश दौरा लांबणीवर पडला आहे. या दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "आदित्य ठाकरे यांच्यामुळेच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द झाला. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. कुठे चालले होते माहित नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. महाराष्ट्रातली गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे. ती आधी इथे आणा. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. नागपूर बुडाला आहे, महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्यानंतर कळालं का? महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होता. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावं याचं नैतिक भान असायला हवं. कलाकार येतात आणि जातात तिथे दुसरा मुख्यमंत्री असतील तर ते तिकडे येऊन नाचतील. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख कमी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचं दुःख हरण करायला हवं."


कांदा प्रश्नावरुन सरकारवर निशाणा


यावेळी कांदा प्रश्नावरुन देखील संजय राऊत जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की संबंधित खात्याचे मंत्री मुंबईत येऊन गेले. या राज्याला कृषीमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? शंभर कोटींच्या क्लिंटलच्यावर कांदा पडून आहे. कांदा व्यापारी अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. तुमचे मंत्री आले आणि गेले त्यांनी दिल्लीत बोलावलं प्रश्न महाराष्ट्रात मंत्री आले आणि काय म्हणाले दिल्लीत या," असं ते म्हणाले.


शिंदे गटाता एकही खासदार संसदेत नसेल


महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत असताना अनुपस्थित राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांचं ठाकरे गटाच्या अनुपस्थित खासदारांना पत्र लिहिलं आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "ते आम्हाला काय व्हिप बजावणार. 2024 नंतर हे कुठेच नसणार. यापैकी एकही खासदार संसदेत नसेल .मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल हे पक्क आहे."


VIDEO : Sanjay Raut On Supriya Sule : कोणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार : संजय राऊत



हेही वाचा


Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार? बारामतीत नणंद-भावजय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता