मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकारी रणजीत नरोटे (Ranjeet Narote) यांनी केला. "अजित पवार (Ajit Pawar) लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे," असा मजकूर असलेले एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली. ज्यावर लिहिलं होतं की, "हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे."


दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले होते. अनेकांनी गणपतीच्या देखाव्यातून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. आता आज अशी चिठ्ठी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी जोर धरु लागली आहे.


अजित पवार समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 


अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परंतु मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचं स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यातच आता अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची समर्थकांची इच्छा आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्ते राज्यातील अनेक भागांमध्ये अजित पवार यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावत असल्याचं पाहायला मिळालं होतं. 


अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा देखावा


पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार राजभवन इथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे. "माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्यांची एकच भावना आहे, ती म्हणजे अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा देखावा साकारला असून गणरायाकडे एकच प्रार्थना आहे, ती म्हणजे दादांना मुख्यमंत्री करावे आणि गणराया आमची प्रार्थना ऐकतील, अशी भावना बाबासाहेब पाटील यांयांनी व्यक्त केली.


हेही वाचा


राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ? आज अधिकृत घोषणेची शक्यता