सोलापूर : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki Bahin Yojana) केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे. रवी राणा यांनी आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणची रक्कम 3 हजार करु  मात्र, ज्या महिला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून 1500 परत घेणार असल्याचं म्हटलं होतं. रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रवी राणांना कडक शब्दात इशारा दिला आहे.  


सुप्रिया सुळेंचा कडक शब्दात रवी राणांना इशारा


सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते आणि  हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, एक मिनिटं तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं तरी देव पावला म्हटलं जातं. तो काही म्हणत सगळ सोडून इथं बसा, पांडुरंग हा एकच देव आहे, जो म्हणतो माझ्याकडे आलं नाही तरी चालेल, चांगली सेवा करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन, माझ्याकडे यायची गरज नाही. ही संतांची भूमी आहे, संस्कारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या व्हिडीओ क्लीपचा आवाज लोकांना ऐकवला. मी  1500 रुपये माघारी घेईन म्हणतात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. 


तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असं म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे.  मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको भावांनी प्रेम दिलं यावरच आम्ही खूश असतो. नको बाबा तुझे  1500 रुपये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 


1500 रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचं आहे  की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना 1500 रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव, बघते तुझा काय कार्यक्रम करते, ये नही चलेगा अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला.


या सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घाणेरडं, गलिच्छ राजकारण सुरु केलं आहे ते बंद केलं पाहिजे. हे सरकार का बदललं पाहिजे, घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला संपवण्यासाठी बदललं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.


रवी राणा काय म्हणाले?


आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं रवी राणा म्हणाले होते.


पाहा बातम्या :



संबंधित बातम्या : 


Ravi Rana : 'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण


महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही; लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?