Pune : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदाराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने निवडून आणलं आहे. त्यामुळं राज्यात एका वेगळ्याचं निवडणुकीची चर्चा रंगलेली आहे. पुण्यातील आई एकविरा देवीच्या ट्रस्टवर भिवंडीचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रेंची वर्णी लागावी, यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते. या निवडणुकीत एकूण सात सदस्यांमधील शेळकेंच्या पाच समर्थकांनी म्हात्रेंना मतदान केलं. त्यामुळे सात शून्य अशा फरकाने म्हात्रे निवडून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. स्वतः शेळके निवडणूक प्रक्रियेवेळी तिथं ठाण मांडून होते, त्यांनी ही याची कबुली दिली.
आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम वेगळं आहे : सुनील शेळके
आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम वेगळं आहे. त्यांना मी दिलेला शब्द पाळला, असं म्हणत निर्माण होणाऱ्या चर्चांवर शेळकेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं म्हात्रेंनी शेळकेंचे आभार मानले. मात्र त्याचवेळी माझं नाव शरद पवारांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत आहे. तर मग त्यांना विचारा, मी कधी येऊ? अशी मिश्किल टिपणी ही शेळकेंनी खासदार म्हात्रेंसमोरचं केली.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे काय म्हणाले?
सुरेश म्हात्रे म्हणाले, आज माझी विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे मी आदरणीय आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा जून 2023 मधील विषय होता. 18 जुलै रोजी आम्ही सर्वांनी अर्ज भरले होते. मात्र, त्यानंतर कोर्टातून काहीना काही अडचणी आल्यामुळे निवडणुकीला खूप उशीर झाला. सर्व विश्वस्तांनी मला आणि दीपकअण्णांना सातच्या सात मतं दिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आई एकविरा हे फार मोठं देवस्थान आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करु, असा शब्दही सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत सुरेश म्हात्रेंकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे केंद्रीय मंत्र्याचा पराभव करत खासदार बनले. भिवंडी मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला होता. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरले होते. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर विरोधात उभे ठाकले असताना पुण्यातील निवडणुकीत मात्र, दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र एकमेकांना मदत करताना दिसत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या