रायगड : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिला भगिनींसाठी कांतिकारी योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू करण्यात आली असून 1 जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला भगिनींनी (women) संबंधित विभागात, सेतू कार्यालयात आणि शासकीय कार्यालायात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरातून या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी म्हटलं. महिला व बालविकास मंत्रालयाची प्रमुख या नात्याने मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अभिमान आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना थेट दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक अकाऊंटमध्ये मिळणार असल्याचं गणितही त्यांनी सांगितलं.  


माझ्या विभागातील प्रस्तावित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या योजनांकडे बारकाईने लक्ष असते. अत्यंत पारदर्शक आणि सुलभरित्या ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे, याबाबतही आदिती तटकरे यांनी माहिती दिली.  


जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


योजनेतील महिला ग्राहकांना येणाऱ्या बँकेतील अडचणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सोडवणार असून अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करणार आहे. बँक खाती आणि इतर कागदोपत्री अडचणी दूर होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन बँक प्रतिनिधींना आदेश देण्याचे सांगण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कोणतीच अडचण येणारं नाही, याची दखल घेण्याबाबत चर्चा झालेल्या आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले.  


2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ


माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे अनेक महिलांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे. आता, या महिलांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे थेट 1500 रुपये जमा होणार आहेत. राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. 


एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, एका कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? 



  • योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. 

  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला/मतदान ओळखपत्र किंवा रेशनकार्ड

  • बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • रेशनकार्ड

  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र