Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : राज्यात अधूनमधून 2019 मधील पहाटेच्या शपथविधीवरुन विविध दावे केले जातात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे शपथविधीच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केला आहे.


ते सरकार करताना अजित पवार यांना स्वीकारण्याचं कारण असं होतं त्यावेळचे शिवसेनेचे नेते तत्कालीन नेते उद्धव ठाकरे जे वागले, ज्या पद्धतीने राजकीय अव्यवस्था जन्माला घातली, त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी अशाप्रकारे समर्थन घेणं आवश्यक होतं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. 


मुनगंटीवार यांच्या वक्तव्याशी सहमत : संजय शिरसाट 


सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याशी आपण पूर्णपण सहमत आहोत. राष्ट्रवादीने स्वार्थ साधला. त्यांनी ठरवून केलेला तो गेम होता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्त संजय शिरसाट यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "भाजपने जी पहाटेची खेळी केली ती योग्य होती. फक्त अजित पवार नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत होता. काही काळानंतर शरद पवारांनी जो स्टॅण्ड घेतला की त्यानंतर अजित पवारांसह काही मंत्रि मंत्रिमंडळात आले, ते नंतर मंत्रीच झाले. भाजपसोबत मंत्री म्हणून शपथ घ्यायचा प्रयत्न करत होते. इकडे आल्यानंतरही मंत्री झाले. हा ठरवून केलेला गेम होता. ठरवून केलेली खेळी होती. म्हणून मुनगंटीवारांनी सांगितलेलं ते योग्यच होतं. आम्ही त्यांच्या वक्तव्याशी पूर्ण सहमत आहे. उद्धव साहेबांना भाजपसोबत जायचं नव्हतं आणि त्यांना मुख्यमंत्री बनायचं होत म्हणून हे सगळं झालं." "2019 मध्ये युतीत आम्ही निवडून आलो, शिवसेना भाजप सरकार स्थापन होईल याचा आनंद आमच्या मनात होता. मात्र आपल्याला भाजपसोबत जायचं नाही असं आम्हाला कळलं. आम्ही पण नाराज झालो होतो. एकनाथ शिंदे पण उद्धव साहेबांना म्हणत होते की चला भाजपसोबत जाऊ, पण उद्धव साहेब नाही म्हणाले," असा दावा शिरसाट यांनी केला आहे.


मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नाही : संजय राऊत


याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नाही, ते काय आम्हाला सांगत आहेत, अस संजय राऊत म्हणाले.