मुंबई : एकीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक केल्यानंतर विधिमंडळाच्या सभागृहात आमदारांनी निषेध व्यक्त करत निंलबनाची मागणी केली होती. त्यानंतर, सर्वानुमते अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला असून विधानसभा अध्यक्षांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दुसरीकडे महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी छावा (Chhaava) सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं आहे. मुंबईतील आयनॉक्स सिनेमागृहात या सिनेमाचं स्क्रिनिंग होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील राष्ट्रवादी व भाजपचे बडे नेते, आमदार या चित्रपट सोहळ्याला उपस्थित आहेत. मात्र, शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे सर्वच नेते व आमदार अनुपस्थित आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्क्रिनिंगला हजर नसल्याने महायुतीमधील नाराजीची चर्चा पुन्हा रंगली आहे.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या छावा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केलं आहे. मात्र, यावेळी शिवसेना शिंदे गटावर खोचक टीका केली. गद्दारांना छावा सिनेमा दाखवलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मात्र, या सिनेमा स्क्रिनींगकडे एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. राज्यातील सर्वपक्षीय आमदार व राजकीय नेत्यांसाठी मंत्री आदिती तटकरे यांनी छावा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते. या आयोजित केलेल्या 'छावा' चित्रपटाच्या विशेष शो कडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सेनेची पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छावा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे स्वागत केले असून छावा सिनेमा गद्दारांना दाखवाच, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाला टोला लगावला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे बहुतांश सर्वच नेते या स्पेशल स्क्रिनिंगला गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिंदेच्या शिवसेनेतील मंत्री आशिष जैयस्वाल सोडल्यास इतर कुठलेही बडे नेते किंवा स्वत: एकनाथ शिंदे हेदेखील चित्रपट पाहण्यास उपस्थित राहिले नाहीत. मात्र, दुसरीकडे ठाकरेंचे नेते या शो ला आवर्जुन उपस्थित होते. ठाकरेंच्या सेनेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, आमदार महेश सावंत हेही सिनेमा पाहण्यासाठी हजर होते. त्यामुळे, महायुतीत सुरू असलेला 'का रे हा दुरावा' याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. यानिमित्ताने भाजप आणि ठाकरेंच्या नेत्यांमधील 'माझी तुझी रेशीम गाठ' पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.
हेही वाचा
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या