मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज अधिवेशन सुरू असताना विधिमंडळ सभागृहात हजेरी लावली. शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजलेल्या मुद्द्यावरुन आज सभागृहात गदारोळ झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत सत्ताधारी व विरोधकांनी या प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे, औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अबू आझमींचं यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते निलंबन करण्यात आलं आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, निलंबन किती दिवसासाठी केलंय हे महत्त्वाचं आहे. कारण, हे निलंबन 5 वर्षांसाठी करायला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी, आज सर्व आमदारांना 'छावा' सिनेमा दाखवण्यात येणार असल्याचे स्वागत करत गद्दारांना छावा (Chhaava) सिनेमा दाखवायलाच हवा, असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला. 


अबू आझमींच्या निलंबनावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निलंबन कायमचं, 5 वर्षांसाठी केलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. छावा चित्रपट दाखवण्याची संकल्पना मांडली, त्यांचे मी अभिनंदन करतो. संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवत आहेत, ते चांगलंच आहे. मात्र, शिवाजी महाराजांवरील चित्रपट देखील दाखवला पाहिजे. सूरतेला पळून गेलेल्यांना दाखवलं पाहिजे की, आपल्या महाराजांनी सूरत कशी लुटली होती, त्यांचं शौर्य समजलं पाहिजे. मेलो तरी बेहत्तर पण त्यांनी धर्म बदलला नाही, त्यामुळे आपल्या संभाजीराजांचा पिच्चर गद्दारांना दाखवलाच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेत शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 


अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशीर झाला, पण आत्तापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, असे म्हणत निलम गोऱ्हे यांच्या देखील निलंबनाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, याच अधिवेशना निलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आम्हाला चर्चा अपेक्षित आहे. आम्ही ज्या कारणासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे, ती कारणं तुमच्यासमोर येतील. याशिवाय पक्षांतर हा देखील विषय आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. निलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीजच्या वक्तव्यावर बोलताना, माझ्या शिवसेनेच्या महिला रणरागिणींनी व शिवसैनिकांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलंय, असे ठाकरे यांनी म्हटले.  




हेही वाचा


पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी