Lok Sabha Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) जागावाटपाचा महायुतीमधील (Mahayuti Seat Sharing) तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. अशातच दक्षिण मुंबई लोकसभेच्या (South Mumbai Lok Sabha) जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena - BJP ) रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी (BJP) सोडण्याचा आग्रह भाजप नेत्यांकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे दोनही पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या बैठकांनंतर देखील दक्षिण मुंबईच्या जागेवर तोडगा निघू शकला नसल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण महायुतीत भाजप आणि शिवसेना दोनही पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असे भाजपचे मत आहे. त्यामुळे उमेदवार कुणीही असो, मात्र निवडणूक कमळावर लढवली पाहिजे असे भाजप व संघ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण कमळ चिन्हावर हा मतदारसंघ जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ भाजपला सोडायला तयार नाही.
शिवसेनेकडून मिलिंद देवरा, तर भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक...
भाजप शिवसेना युतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सेनेकडे राहिला आहे. गेल्यावेळी अरविंद सावंत येथून निवडून आले होते. मात्र, अरविंद सावंत हे ठाकरे गटात आहेत. असे असलं तरीही हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथून आपलाच उमेदवार देण्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तर, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा व यशवंत जाधव लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा हे काँग्रेसचा हात सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे भाजपकडून राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत.
दक्षिण मुंबईसाठी भाजपचा हट्ट का?
- विधानसभेत युती नसताना झालेल्या स्वतंत्र लढतीत भाजपने शिवसेनेहून अधिक मते घेतली होती.
- दक्षिण मुंबईत सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केवळ एक आमदार असून, दोन आमदार ठाकरे गटाकडे आहेत.
याउलट भाजपचे दोन आमदार कार्यरत आहेत. - गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा जबरदस्त मोदी लाट दिसेल, त्यामुळे भाजपसाठी दक्षिण मुंबईत पोषक वातावरण असेल असे भाजपचे मत आहे.
- विशेषतः महिला व तरूणांवर असलेले नरेंद्र मोदींचे गारुड पाहता धनुष्यबाणाहून अधिक मते कमळाला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
- हे सर्व पाहता दक्षिण मुंबईत शिवसेनेला उमेदवार द्यायचा असेल, तर तो कमळ चिन्हावर द्यावा, अशीही चाचपणी महायुतीत सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :