नागपूर - लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींनी वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये एकीकडे उन्हाचा पारा चढला असतानाच, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळते. येथून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी, काँग्रेसवर निशाणा साधत केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचाऱ्यांकडून सरकारी तिजोरीत पैसा जमा करुन घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र, काँग्रेसकडून (Congress) आता थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  


 


देशातील कर्तव्यदक्ष मंत्री आणि देशातील गतीमान दळणवळणाचा प्रमुख चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते, पायाभूत सुविधांमधील त्यांचं कामही चर्चेत असते. अनेकदा स्पष्टवक्तेपणा आणि विकासाच्या मुद्द्यावरुन त्यांचे भाषणही व्हायरल होते. तर, विरोधकांकडून त्यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांच्यासारखा नेता नाही, अशा शब्दात गुणगान गायले जाते. विशेष म्हणजे भाजपाच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत गडकरींचं नाव नसल्याने, त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीही देण्याचं शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंनी जाहीर केले होते. मात्र, आता त्याच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्याने नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 


मोठा रस्ता करून गडकरींनी फक्त भ्रष्टाचार केला


नागपुरात जुन्या पायाभूत सुविधा तोडून नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपवाल्यांनी त्याचे कंत्राट आपल्याच लोकांना दिले. त्यासाठी सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचे कंत्राटही आपल्याच कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे नागपुरात भाजपचे सर्व लोक श्रीमंत झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. नागपुरात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या प्रचार सभेत मुत्तेमवार यांनी हे आरोप केले. यावेळी, गडकरींवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 


नागपुरसाठी एम्स रुग्णालय आमच्या काळात मंजूर झाले, ते आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उभारणार होतो. मात्र, गडकरींनी हे एम्स नागपूर शहराच्या 20 किमी बाहेर नेले. याशिवाय भाजपवाल्यांनी आम्ही केलेले डांबराचे रस्ते फोडून काढले. अनेक फ्लायओवर तोडून नवीन फ्लायओवर बनवले. नागपुरात एक लाख कोटींची कामे केल्याचा दावा नितीन गडकरी करत आहेत. मात्र, हे खोटं आहे, नुसतं भाव वाढवून, आवश्यकता नसेल तिथे रस्ता करून छोट्या रस्त्याऐवजी मोठा रस्ता करून गडकरींनी फक्त भ्रष्टाचार केला. गडकरिंसारखा भ्रष्टाचारी पूर्ण महाराष्ट्रात कोणी नाही, असा गंभीर आरोपही मुत्तेमवार यांनी जाहीर सभेत केला. राजकारणात कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक प्रतिमा असलेल्या गडकरींवर केलेल्या या आरोपामुळे आता भाजपा काय प्रत्युत्तर देते किंवा भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


गडकरी हॅटट्रिक साधतील का?


नितीन गडकरी नागपूरमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या २ टर्ममध्ये त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून यंदा ते विजयाची हॅट्रटीक साधतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. तर, वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, काँग्रेसला थोडेसे बळही मिळाले आहे. दरम्यान, विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होईल. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2004 पासून पूर्व विदर्भात भाजपने आघाडी घेतली असून नागपूर हे भाजपाचे केंद्रस्थान बनले आहे.