अमरावती : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे माजी स्थायी सभापती आणि शिंदे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत लेकाशी काय भिडता? बापाशी भिडा, असे म्हणत पलटवर केला होता. आता श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशास तसं उत्तर दिले आहे. 


उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, कल्याणमधील शिवसेना प्रेमी मतदारांचा मला अभिमान आहे. एका बाजूला पैसा, ताकद, झुंडशाही असूनही आपल्या कार्यकर्तीला चार लाख मतं मिळाली. समोरच्या बाजूनं मुख्यमंत्र्यांचं कार्ट होतं, त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता, त्यांनी सगळी यंत्रणा वापरली. साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिकडे यावं लागलं. कल्याणकरांनी चार लाखं मतं आपल्या भगव्याला दिली, अशी टीका त्यांनी केली होती. 


श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 


उद्धव ठाकरेंच्या टीकेवर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरे यांना याच कार्ट्याने चॅलेंज केलं होतं. येऊन तिकडं निवडणूक लढवावी. पण, ते तिथून पळाले आणि जे साडे तीन लाख मतं मिळाली ती मुंब्राची मतं आहेत. मराठी मतं आणि हिंदू मतं उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेलेले आहेत. ज्यांना मुंब्राचा अभिमान वाटतो तिथं त्यांनी स्वतः येऊन लढावं. जे काही शिल्लक आहे ते फक्त मोजक्याच समाजाच्या भरवश्यावर निवडून आले आहेत, असे प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर पलटवार केला होता. त्यांनी म्हटलं होतं की,  मला त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचं नाही. आम्ही कामातून उत्तर देतो, म्हणून ते बिथरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बहीण लाडकी भरली धडकी, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. अरे बापाशी भिडा ना, लहान मुलाशी काय भिडताय, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. 


आणखी वाचा 


'सुरक्षा काढली, भाजपाच्या दडपशाहीला कंटाळलो,' शिंदेंची साथ सोडताना दीपेश म्हात्रेंची खदखद बाहेर; हाती बांधलं शिवबंधन!