मुंबई : शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या होता. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 50 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत (Mahavikas aghadi) बिघाडी झाली का, महाविकास आघाडी पुढे टिकणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच, सत्ताधारी पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मेळाव्यांचंही आयोजन केलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत साधारणपणे दीड तास चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक आटोपून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे निघाले. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, 25 जानेवारी रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींला कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भाने सुनावणी होत आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्तांचीही नेमणूक केली जाणार आहे. मंत्रिपपरिषदेतून यासंदर्भातील सर्वच अधिकार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले आहेत.
मविआच्या राज्यस्तरीय नेत्यांची बैठक
महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता आणि त्या दृष्टिकोनातून पुढील पावलं नेमकी काय उचलायची. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रणनीती काय असेल, यासाठी लवकरच महाविकास आघाडीची राज्यस्तरीय महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुद्धा होऊ शकते.
उद्धव ठाकरेंना पुस्तक भेट
दरम्यान, आजच्या बैठकीदरम्यान 50 वर्षांच्या वानखेडे स्टेडियमच्या स्मरणिकेचे पुस्तक आणि वानखेडे टपाल तिकीट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आले. ICC चे माजी अध्यक्ष शरद पवार, क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर, आणि एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याहस्ते हे तिकीट पुस्तक देण्यात आले. वानखेडे स्टेडियमच्या वैभवशाली वारशाचा गौरव करणारा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांनी दिली.
हेही वाचा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया