Uday Samant: महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्र्यांच्या यादीवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे तातडीने दरे गावाला रवाना झाले आहेत. चार दिवासांसाठी एकनाथ शिंदे दरे गाव दौऱ्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली. दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माझी माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, असं विधान संजय राऊतांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. 


मंत्री उदय सामंत काय म्हणाले?


संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दावोसला पोहचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली. संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रिपद मिळालं, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरु शकणार आहे. माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकीयपलीकडचे आहे. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. 


अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही- उदय सामंत


विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबियातून मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातील मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण ठेवू नका, कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटला? त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये, हीच माझी सूचना आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे बघते वेळेस संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेलं विधान खोटं आहे. त्यांचा निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेंसोबत होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्या वेळी त्यांना गरज लागेल, तरी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे. त्यामुळे अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. 


विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?


नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 


उदय सामंत काय म्हणाले, VIDEO:



संबंधित बातमी:


Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?