भंडारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका आणि महाविकास आघाडीवर त्याचा होणारा परिणाम याबाबत भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना मुंबई, पुणे ते नागपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी फुटली अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, भंडाऱ्यात त्यांना मविआबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढल्यास त्याचा मविआवर परिणाम होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत भंडाऱ्यात काय म्हणाले?
तुमचं आज सकाळचं स्टेटमेंट होतं, आगामी स्वबळाच्या नाऱ्यामुळं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना भंडारा येथील पत्रकारांनी विचारलं. यावर संजय राऊत यांनी अजिबात नाही, माझं स्टेटमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत नागपूरमध्ये काय म्हणाले?
संजय राऊत यांनी नागपूरमध्ये लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती, असं म्हटलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक मध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे.आम्ही नागपूर आणि मुंबई सह सर्व महापालिका मध्ये स्वबळावर निवडणूक लढवू, असं संजय राऊत म्हणाले. इतर पक्षांनी पण कार्यकर्त्यांसाठी स्वबळावर निवडणूक लढवावी असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेस अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय?
काँग्रेसचे नागपूरमधील आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसनं देखील स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे असं म्हटलं. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून एकत्र असताना देखील आली अनेक महापालिका वेगवेगळ्या लढल्या आहेत, असं म्हटलं. तिन्ही पक्षाची भूमिका जिथे शक्य होईल तिथे युती करणार अशीच आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे वरिष्ठ आम्ही एकत्र बसून धोरण ठरवू, असं सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरात आमची युती व्हायला काही अडचण येणार नाही असं वाटतंय. वेगळं लढल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं काही होणार नाही, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढतो असं स्पष्ट केलं.
इतर बातम्या :