मुंबई : मराठी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे.
कोण किती जागा लढवणार?
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.
बेस्टच्या पतपेढी निवडणुकीच 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज दुपारी 4 पर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत होती.
बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल म्हणून ही निवडणूक एकत्रित लढणार आहेत.
उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांची नावं
सर्वसाधारण प्रवर्ग : सारंग उमेश श्रीधर,कोंडे प्रशांत वसंत, वारिसे रविंद्र राजाराम, इंदप मधुकर दिनकर, राजगुरू अशोक शंकर, टुकरूल महेश मोहन, माळी स्वामी हणमंत,पवार जितेंद्र दत्तात्रय,हरयाण अविनाश सुरेश,लोखंडे सुकुमार विष्णू, तळपाडे किसन मारूती,सुर्वे शिवाजी रामचंद्र, गोरे राजेश काशिनाथ, मांढरे निलेश प्रकाश, संगम काशिनाथ बलराम,राऊत नरेंद्र दत्तात्रय
महिला राखीव
पवार बबीता अजित, मानकामे सिमा गिरीश
ओबीसी प्रवर्ग
रेडीज नितीन मनोहर
एससीएसटी प्रवर्ग
मोहिते शैलेश जयराम
व्हीजेएनटी
बंडगर महादेव सोपान
बेस्टमध्ये युती, महापालिकेचं काय?
ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितलं आहे. युती संदर्भातील निर्णय पक्षाच्या पातळीवर होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळं आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही भावांची राजकीय युती होणार का ते पाहावं लागेल.