ठाणे: मीरा भाईंदर शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे मिरा भाईंदरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
नाशिकच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी बुधवारी ठाकरे गटातील नाशिकच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सभापती पवन पवार आणि मनसेचे माजी नगरसेवक सभापती योगेश शेवरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. कालच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नाशिकचे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे यांच्या निवासस्थानी जमले होते. उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात अजून कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
राजन साळवी यांचा ठाण्यात पक्षप्रवेश, हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल
राजन साळवी यांच्या आज शिंदे गटात होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी लांजा, राजापूर, साखरपा या भागातील त्यांचे हजारो कार्यकर्ते बुधवारी रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नावाचा जयघोष केला. आज हे सर्व कार्यकर्ते साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी हजर राहणार आहेत. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून ठाण्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांना शिवसेनेत योग्य ते सन्मान मिळेल, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी व्यक्त केली.
राजन साळवी काय म्हणाले?
राजन साळवी यांच्या आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी किरण सामंत आणि राजन साळवी यांची बैठक पार पडली. रात्री तब्बल दोन तास बैठक सुरु होती. यानंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही.. परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. आजच्या या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत.
सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.