नागपूर : उद्धवजी फक्त एक दिवस सभागृहात येऊन चालणार नाही, रोज पूर्णवेळ या. जेणेकरून तुम्हाला जनतेचे गंभीर प्रश्न कळतील. असा सल्ला देत महायुती सरकारचे मंत्री व पूर्वश्रमीचे उद्धव ठाकरेंचे सहकारी आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.


उद्धव ठाकरे यांनी रोज विधान परिषदेत यायला हवं. ते विधान परिषदेचे सदस्य असून सदस्य जेव्हा सभागृह येतो, तेव्हा त्याला सामान्य जनतेचे प्रश्न कळतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यायला पाहिजे आणि पूर्णवेळ सहभागी झालं पाहिजे. तसेच त्यांना जनतेचे गंभीर मुद्दे कळतील असे म्हणत उद्धव ठाकरेंना शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त मंत्री आशिष जयस्वाल यांनी टोला लगावला आहे. उद्धवजी प्रत्येक अधिवेशनात फक्त एक दिवस येऊन होणार नाही. त्यासाठी रोज येऊन पूर्णवेळ बसून सर्व संसदीय आयुधांचा वापर केला पाहिजे. सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्याचे फोरम असून उद्धव ठाकरेंनी त्याचा लाभ घ्यायला हवं असे ही आशिष जयस्वाल म्हणाले.


उद्धव ठाकरे यांची पुन्हा हिंदुत्वाकडे येण्याची इच्छा झाली असेल तर स्वागत


विरोधकांमध्ये एकी नाही हे आज दिसून आल्याचे ही जयस्वाल म्हणाले. आज सकाळी जेव्हा नाना पटोले यांनी सभागृहाचा बहिष्कार केला. तेव्हा उबाठाच्या आमदारांनी त्यांचं ऐकलं नाही. तर अध्यक्षांच्या अभिनंदनचा प्रस्ताव आला, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांचे अभिनंदन केले. मात्र त्यावेळेस उबाठाचे आमदार बाहेर होते. त्यामुळे विरोधकांमध्ये स्पष्ट दुफळी दिसून येत असल्याचे ही जयस्वाल म्हणाले. उद्धव ठाकरे यांची पुन्हा हिंदुत्वाकडे येण्याची इच्छा झाली असेल तर त्यांचा स्वागत आहे. उद्धव ठाकरे म्हणतात काँग्रेसने सावरकर बद्दल बोलणं सोडावं. मात्र काँग्रेस त्यांचं ऐकते का? काँग्रेस त्यांचा काहीही ऐकायला तयार नाही असे ही जयस्वाल म्हणाले.


अयोध्येच्या धर्तीवर रामटेकचा विकास 


22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष होत असताना आम्ही महाराष्ट्रातील रामटेकमध्ये भव्य दिव्य पद्धतीने तीन दिवसीय राम महोत्सव आयोजित करणार आहोत. भविष्यात रामटेकची ब्रॅण्डिंग आणि मंदिरसह शहराचा विकास अयोध्येच्या धर्तीवर करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंजुरी दिली आहे. लवकरच त्या संदर्भातला जीआर काढला जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.


हेही वाचा