मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच गुरुवारी आणखी एका घटनेमुळे या तणावात भर पडली. या घटनेमुळे आता मुंबईत भाजप (BJP) आणि शिंदे गटात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गुरुवारी संध्याकाळी महायुतीचा (Mahayuti) मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.


ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा (mihir kotecha) यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सभास्थळी राजकीय बॅनर्स लागले होते. मात्र, सभेच्या ठिकाणी असलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. भांडुप हा मराठीबहुल भाग आहे. या भागात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. तरीही सभेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो न लावण्याची चूक घडली. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले. 


शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला. भाजपच्या नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपली नाराजी व्यक्त केली. भाजप नेते आशिष शेलार व्यासपीठावर बोलत असताना अशोक पाटील हे व्यासपीठावर गेले आणि तिथे जाऊन त्यानी सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. यामुळे या सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महायुतीच्या गोटात या घटनेबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. 


आणखी वाचा


देशात काय होईल ते माहिती नाही, पण मोदींचा घोडा महाराष्ट्र थांबवल्याशिवाय राहणार नाही; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं भाजपला चॅलेंज